तुझं जगणं.... तुझ्यासाठीच

 तुझं असणं.... तुझ्याचसाठी


तुझं असणं तुझ्यासाठी असावं

तुझं जगणं तुझ्यासाठी असावं


तुझ्या मनानं तुझ्या मनाशीच

आता नव्याने संधाण बांधाव

लाख खेळू पाहतील लोक तुझ्या भावनांशी पण...

 खेळणं बनायचं का नाही  हे त्यांनी नाही तर तू ठरवावं.

आवडली एखादी गोष्ट

 तर खुशाल दाद दे.

आणि

जी वाट रुचतच नाही मनाला

तिथून खुशाल माघार घे.

दुःखाला यायचं असेल आयुष्यात तर त्याच्या स्वागताला

हसतमुखाने तयार रहा.

आणि आनंदाच्या क्षणीही कधी उतू जाऊ देऊ नकोस

तुझा सुखाने भरलेला झरा.

पावलं म्हणतील नाच तेव्हा 

एकटी तर एकटी ... नाचून घे.

रडायची वेळ आलीच कधी तर

आभाळ मोकळं होईपर्यंत बरसून घे.

येणार नाहीच यश अलगद कवेत

पण म्हणून चालायचं थांबवू नकोस.

तुझ्या प्रत्येक पावलावर 

स्थिर राहू दे तुझी नजर.

प्रलोभन की प्रयत्न...

एक वाट ठरवच तुझी तू.

तुझ्या यशाचा सूर्योदय होणारी

पूर्व दिशा तू.

नको बाई अशी छोट्या छोट्या गोष्टी वर 

अख्खं पान भरुन लिहू.

एका एका शब्दासाठी 

अख्ख्या 

आयुष्याचं गाणं गावू.

बघ जरा इकडं...

किती छान सूर्योदय झालाय

तू मात्र मावळतीच्या रंगांचाच अजुन

साज अंगावर ल्यायलाय.

उतरव तो साज जरा

अन् जरा माझ्याकडे बघ

तुझं मन तुला खुणावतय

जरा त्याला ही 

थोडं डिमांड देऊन बघ.

कालची मावळती आज नाही

आणि आजची

 उषा नाही उद्या.

सांग बरं कोण पसरेल 

तुझ्यासाठी 

स्वतः हून

 मऊ मऊ गाद्या?

दगड तर दगड

 पण झोप येईल तेव्हा

 झोपून घे.

वाटलच कधी जागाव तर मग मात्र

तुझ्या मनाशी

 रात्रभर गप्पा मारून घे.

खूप झालं आता दुसऱ्यांसाठी झिजण

आता तुझ्यातल्या तुझ्यासाठीच जगून घे.

संसार तर आहेच ग

तो सोडून कस चालेल?

पण या सगळ्यात मात्र

तुझ्यातल्या तुला विसरू नकोस.

दिवसातला एक तास तरी

 तुझा तुझा

हक्काचा हवा.

त्या क्षणी तरी किमान तू 

स्वतः चाच शोध घ्यावा.

सगळ्यांना भेटवस्तू देतेस

कधीतरी

स्वतः साठी ही काहीतरी गिफ्ट आण.

तूच कर पॅकिंग त्याचं

अन् मग ते फोडल्यावर मिळणाऱ्या आनंदाचं गाणं

जरा आरशात पाहून तुझी तूच वाच.

नसशील तू सुंदर अन् गोरी

पण तरी ही

स्वाभिमानाच्या तेजाने चेहरा तुझा

नेहमीच उजळू दे.

स्वार्थापायी तळवे चाटनारांच्या माना

आपसूकच शरमेने खाली झुकू दे

कशाला व्यर्थ शोधत बसतेस

शब्दांचा आधार

मनाच्या सामर्थ्या शिवाय

 इथं

 प्रत्येक गोष्ट आहे बेकार.

म्हणूनच फक्त 

उगवती कडे पहात रहा अन्

तुझ्या पावलांची दिशा

तुझी तूच ठरवून घे.

झेप घे...

 खरचं उंच आकाशी झेप घे

अन्

नव्या सूर्याच्या साथीने

प्रकाशाचा प्रत्येक किरण 

पांघरूण घे.

नव्या सूर्याच्या साथीने प्रकाशाचा

 प्रत्येक किरण पांघरूण घे.

                आराधना गुरव

Comments

Popular Posts